🌷उत्सव प्रिय समाजाची अधोगती 🌷
07/09/2025
समाज म्हटले की,समुह आलाच.हा समुह होण्यासाठी किंवा समाज समुहात एकत्र येण्याची अनेक कारणे आहेत.उदा.लग्न,नामकरण,अलिकडे जोर धरणारी पद्धत म्हणजे वाढदिवस साजरा करणे.या आनंदा बरोबरच समाजातील एकाद्याच्या मृत्यु सारख्या दुःखद प्रसंगी समाज एकत्र येतो.ही फार महत्वाची आवश्यक बाब आहे.सण उत्सव प्रसंगी एकत्र येतो.काही समाजाच्या उत्सव प्रसंगी संस्कृतीचे दर्श़नही होते.आपली संस्कृती जपली पाहिजे,यासाठी पारंपारिक पद्धतीने चालत आलेले उत्सव उपयोगीच ठरतात.पण यात आता काही नवे उत्सव घुसलेले आहेत.किंवा त्यांना पूर्वीचे जुने जरी म्हणाले तरी या उत्सवात ज्या काही बाबींची भर पडलेली आहे ,ते सर्व नवीनच आहेत.उदा.गणपती ,शारदा वा दुर्गा उत्सव,यासाठी विसर्जनाला डिजे लागतोच लागतो.गणपतीने हट्ट केला होता का ? मला डीजे हवा म्हणून.मग गणपतीच्या नावाने चंदा गोळा करायचा, विसर्जनाला डिजे लावायचा आणि मद्य पिऊन झिंग झिंग झिंगाट..... गाण्यावर नाचायचे.दुर्गा विसर्जनाला तुझा झगा ग वाऱ्यावर उडते......या गाण्यावर ताल धरायचा.ही अंधानुकरण करणारी पद्धत आत रूढ होत आहे.याठिकाणी श्रद्धा, भक्ती ,भाव याचा लवलेशही नसलेला हा उत्सव सध्यास्थितीत फार जोर धरलेला आहे.त्यांची श्रद्धा,त्यांना मिळालेले संविधानिक स्वातंत्र्य,हक्क आहेत.त्यानुसार आपल्या घरी करणाऱ्यांना आपण बोलू शकत नाही.
आताच म्हटल्याप्रमाणे संस्कृती जपण्यासाठी उत्सवाचा उपयोग होतो ,पण हे उत्सव अपवाद आहेत.मुळात ते आपल्या संस्कृतीतून आलेले नाहीत.ते कसे नाही,याचे उदाहरण देताना आदिवासींच्या संस्कृती कडे पाहूया.आदीवासी अजूनही आपली संस्कृती जपून आहेत.त्यांची पारंपारीक वाद्ये व नृत्य टिकून आहेत.याला आता मात्र जपणे ,फार जरूरीचे झालेले आहे.कारण पूर्णपणे आदिवासी असलेल्या गावातही गणपतीने प्रवेश केलेला आहे.दुर्गा मांडून आदिवासी युवा युवतींचे गुजराती गरब्याच्या तालावर पाय फिरकायला लागलेले दिसतात.भीती आहे, पारंपारिक रेला पुढच्या पिढित टिकेल का?आदिवासींच्या संस्कृतीचे जतन करता येईल का ? अलिकडे काही भागातील आदिवासी बांधव जागृतीच्या टप्प्यावर आहेत.आदिवसींच्या गुंडाधूर,तंट्या भिल्ल,वीर उमाजी नाईक,बिरसा मुंडा,वीर बाबूराव शेडमाके यांसारख्या शूरवीरांची,शहिदांची ओळख त्यांना होऊ लागलेली आहे.त्यांच्या पुढारलेल्या मंडळींनी,आता आपली खरी मूळ संस्कृती कोणती याची ओळख करून द्यावी.ही त्यांची, तुमची ,आमची जबाबदारी आहे.
माझ्या ओबीसीतील समस्या फार मोठी आहे.शिकले सवरलेली मुले, आपल्या स्वःताच्या करीयर कडे लक्ष न देता गणपती उत्सवात, दहा पंधरा दिवस घालवण्यात स्वतःला धन्य माणतात.देवाजवळ काय मागत असतील,ते त्यांचे त्यांना माहित.
आताच एका प्रशिक्षणासाठी,जे की त्यांच्याच हिताचे होते.मी जाण्यासाठी आपल्या मुलांना विचारलो.पण ते गणपती उत्सवात असल्यामुळे जाऊ शकणार नाही म्हणून मला नकार दिला.काय म्हणावे.भविष्य कसे असेल आपले.
आता मराठ्यांचे मनोज जरांगेच्या नेतृत्वात मुंबईत केवढे मोठे आंदोलन,काहीतरी पदरात घेतल्याशिवाय त्यांनी मुंबई सोडली नाही.आमचा ओबीसी बांधव किमान आहे ते तरी टिकवण्यासाठी रस्त्यावर येऊ शकेल का? जे मागासवर्गात नाहीत त्यांची मागणी आहे, मागासवर्गीय ओबीसी करा.आणि जे मागासवर्गीय ओबीसी आहेत त्यातील बहुतांश जणांना मागासवर्गीय असल्याचे ठावूक नाही,वाटतच नाही.कुठेतरी मी वरच्याच जातीतला आहे असे त्याला वाटते.जातीच्या उतरंडीत फसलेल्या ओबीसीची ही समस्या आहे.
अर्थात आपल्या आयुष्यातील वर्षातील अनेक दिवस,अनेक वर्षातील अनेक महिने उत्सवात निघून जातील.असा आपला उत्सवप्रिय समाज वेळ,पैसा खर्चुन अधोगतीला येईल.तसा आलेलाच आहे.
विसर्जन आहे,लग्न आहे,बारसे आहे,सण आहे,खा प्या आनंद साजरा करा.संत तुकोबाराया म्हणतात
" बुडते हे जन,न देखवे डोळा, म्हणूनी कडवडा येत असे."
याच साठी आपल्या बहुजन महामाणवांनी, माणव समाजाच्या कल्याणासाठी उभे आयुष्य संपविले.उत्सव करायचेच तर ,त्यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करून ,त्यांच्या विचारांचा मार्ग आपण धरणार आहोत का? की महात्मा फुलेंनी आमच्यासाठी काही केले नाही म्हणून त्यांच्याप्रती कृतघ्न होणार आहोत.या महानायकांचा स्वीकार न करणे,त्यांना समजून न घेणे आणि अनावश्यक उत्सवात आपली शक्ती खर्ची घालणे यातच आपली अधोगती आहे.
तुर्त एवढेच.कधी विस्ताराने मांडण्याचा प्रयत्न असेल.
अशोक मांदाडे, गडचिरोली